अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज


अर्थ साक्षरता : काळाची खरी गरज !

अक्षय सयाजी कांबळे (BrotherBheem)
www.Instagram.com/_______chetas

          अर्थ साक्षरता म्हणजे नक्की आहे तरी काय ? हा आपल्याला पडलेला प्रश्न असणारच. आयुष्यात कधी ना कधी या प्रश्नाने आपल्याला गाठलेच असणार. पण आपल्यातील किती जणांनी याच्यापासून पळून न जाता, धीराने सामोरे जाऊन या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे ? अर्थ शास्त्र म्हणजे फक्त आर्ट्स आणि कॉमर्स वाल्यानींच शिकायचं! असा काही नियम आहे काय ? अर्थ म्हणजे पैसा. आणि आपले जीवन याच गोष्टीने वेढल गेलं आहे. तरी आपण या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आहे.
           अर्थ साक्षरता म्हणजे पैसा आहे काय आणि त्याचा वापर कसा करायचा, याबद्दलची माहिती असणं. आता कोण अर्थ साक्षर आणि कोण निरक्षर याबद्दल मला ठळक भाष्य नाही करता येणार कारण या विषयाचे पास आणि नापास चे संदर्भ फार निराळे आहेत. आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आपण आर्थिक महासत्ता बनण्याची इच्छा बाळगत आहोत. जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या पहिल्या शंभर लोकांमध्ये आपले काही भारतीय बांधव आहेत. ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. पण मला चिंता सतावते ती , ' श्रीमंत आणि गरीब लोक यांच्यातील वाढत्या दरिची.' जरी भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असला तरी भारताच्या एकूण GDP च्या 60 ते 70 टक्के वाटा हा भारतातल्या 30 एक मोजक्याच परिवारांचा आहे. ही गोष्ट दुर्लक्षित करता येत नाही. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत आहेत. मध्यमवर्गीय लोक सरकारसाठी कर जमा करण्यात व्यस्त आहेत. ते परिस्थिशी झगडत आहेत. याचं खरं कारण आहे आर्थिक शिक्षणात. आर्थिक शिक्षण हीच खरी संजीवनी आहे आपल्या आर्थिक महासत्ता होण्याची आणि स्वतःची परिस्थिती सुधरवण्याची.
           आपण आर्थिक निरक्षर का आहोत ? आपली समाज व्यवस्था आणि शैक्षणिक पद्धती. याच दोन गोष्टी आपल्या निरक्षरतेला कारणीभूत आहेत हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि यात तथ्य सुध्दा आहे. ते मी पुढे मांडणार आहेच. प्रत्येक व्यक्तीला अर्थ व्यवहारच ज्ञान हे आपल्या घरातच मिळतं. मुख्यतः आपल्या वडिलांकडून. कारण बहुतांश घरात, वडील हेच कमावते असतात आणि घराच्या आर्थिक नाड्या ह्या त्यांच्या हातात असतात. घरातील आर्थिक व्यवहारांची आपल्याला अजिबात माहिती नसते. आपल्याला हवी टीम गोष्ट, हवी तेव्हा मिळते. जास्त हट्ट सुध्दा करावा लागत नाही. एवढाच काय तो आपला संबंध. आपल्यातील किती जण घरातील आर्थिक व्यवहारांची माहिती ठेवतात किंवा आर्थिक निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग असतो ? आणि जर कोणी आपला सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सरळ सरळ ऐकवलं जातं, ' आधी चार पैसे कमव आणि मग बोल.' किंवा ' दोन पैसे कमवायची अक्कल नाहीये, आणि तोंड वर करून बोलतोय.' थोडक्यात काय त्या व्यक्तीला गप्प केलं जातं. ही वस्तुस्थिती आहे.
           आपल्या घरात आपले आई वडील किंवा मोठी बहीण वा भाऊ असेल तर एक गोष्ट नक्की आपल्याला सांगतात. ' शाळेत जा, भरपूर शिक , चांगले गुण मिळव म्हणजे तुला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल. आयुष्यात खूप सुखी होशील.' उत्तम शिक्षण घेतलं म्हणजे प्रत्येक जण यशस्वी होतोच होतो हा फार मोठा गैरसमज ते बाळगून आहेत. पण आजच्या या आधुनिक काळात हा सल्ला कालबाह्य ठरला आहे. याची त्यांना अजिबात जाणीव नाहीये. कारण आपली प्राचीन शिक्षण पद्धती. मुलाच्या आयुष्यातील बरीच वर्ष वाया घालवत आहे. जे जग अस्तित्वातच नाहीये, त्याला तोंड देण्याची तयारी आपली मुलं या वेळेत करत असतात. त्यामुळे 'शाळेत जा, भरपूर शिका आणि नोकरी मिळवा.' हा कानमंत्र सगळ्यात जुना आणि वाईट सल्ला आहे. पैशांबद्दल शाळेत काहीच शिकवलं जात नाही. आजच्या शाळा कॉलेज मध्ये मुलांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य यावरच जास्त भर दिला जातो. सगळ्यात महत्वाचा ' आर्थिक कौशल्य ' हा विषय गृहीत धरलेलाच नाही.
           आर्थिक साक्षरता आणि पैशाबाबत ज्ञान असल्याशिवाय आपण या खऱ्या जगात स्वतंत्रपणे उभं राहू शकणार नाही, या बदलत्या जगाला तोंड देऊच शकणार नाही. आजच्या जगात फक्त बचत आणि बचत या जोरावर काहीच साध्य करता येत नाही. आणि आजची परिस्थिती अजून बिकट आहे. कारण इथे बचतीपेक्षा खर्चाला जास्त महत्त्व दिलं जातं. अशावेळी हे ज्ञान अत्यावश्यक ठरतं. आता तुम्ही म्हणाल की, ' मी माझ्या साठी accountant, banker आणि वकिलाची नेमणूक करेन. कारण त्यांना या बाबतची नक्कीच माहिती आहे त्यांची जी काही फी आहे, ती मी नक्कीच देऊ शकतो.' पण माझा एक छोटासा मुद्दा आहे. पटला तर पहा. ' त्यांना जर या साऱ्याची माहिती आहे. ते अर्थ साक्षर आहेत. असं तुम्हाला वाटतं तर तुमच्या माहितीतील किती accountant , bankers आणि वकील , शेअर दलाल श्रीमंत आहेत ? त्यांना याबाबत नक्कीच माहिती आहे, ते हुशार देखील आहेत पण ते श्रीमंत नाहीत. हा मूलभूत फरक आहे.' आपण हे एक उदाहरण घेऊन समजुयात. ( संदर्भ : रीच डॅड पुअर डॅड )
           तुम्ही कोणत्याही सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या, अगदी कष्टाळू माणसाचं उदाहरण घ्या.सगळ्यांचा मार्ग अगदी आखलेला असतो. मुलाचा / मुलीचा जन्म होतो. काही वर्षांनी शाळेत जाऊ लागतो. पुढे माध्यमिक शिक्षण घेऊन महाविद्यालयात जातो. चांगल्या गुणांनी पदवी मिळवतो. पदवीधर मुलगा सुरक्षित नोकरीचा शोध घेऊ लागतो. काही काळाने त्याला ती मिळते सुद्धा. नोकरी मिळाली की त्याचा हाती पैसा खेळू लागतो. आणि त्याबरोबर सुरू होतो तो खरेदीचा सिलसिला.
           पुढे काही वर्ष गेल्यानंतर स्वतःची इच्छा (प्रेम विवाह) किंवा घरच्यांचा दबाव याला बळी पडून लग्न होत. आयुष्य आनंदी आणि समाधानी झालेलं असतं. दोन प्रेमी जीव एक झालेले असतात. त्यात दोघंही नोकरी करणारे असतात. त्यामुळे भरपूर पैसा असतो. दोघांच्या पगारामुळे पैसे साठू लागतात. मग घरात टीव्ही, गाडी, फ्रीज, वॉशिग मशीन, एअर कंडिशनर, गाडी वैगेरे गोष्टी करताना एखाद्या मोठ्या सहलीला ही जाऊन येतात.आता त्यांना अपत्य हवं असतं. मग काही काळा नंतर ते ही होतं. मुलाची जबाबदारी आल्यानंतर पुन्हा पैशांची गरज भासू लागते. या आनंदी जोडप्याला आपलं करियर ही तितकंच महत्त्वाचं वाटतं असतं. बढती मिळावी, पगारवाढ व्हावी यासाठी ते दुप्पट काम करू लागतात. त्याचवळेस दुसरं अपत्य ही जन्माला आलेलं असतं. आता ते घर त्यांना पुरेनांस होतं. त्यांना मोठ्या घराची गरज असते. त्या साठी अधिक पैशांची गरज असते. अधिक पैसे मिळवण्याकरिता ते कामाला वाहून घेतात आणि सर्वोत्कृष्ट कर्मचारी होतात. कर्ज काढून नवीन घर विकत घेतात. मुलं आता पाच सात वर्षांची झालेली असतात. त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाची काळजी त्यांना सतावू लागते. मुलांचं शिक्षण आणि आपली निवृत्ती यांसाठी बचत करण्याची त्यांना गरज वाटू लागते. सुमारे पस्तीशीच हे दांपत्य आता एका न संपणाऱ्या चक्रात अडकते. आता ते कंपनीच्या मालकासाठी, सरकारचे वेगवेगळे कर भरण्यासाठी आणि कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी म्हणजेच बँकेसाठी काम करू लागतात. आता हेच पालक आपल्या मुलांना काय सांगतात ? शाळेत जा, भरपूर शीक ! ते मुलं ही तसंच करतं. भरपूर अभ्यास करतं. चांगले गुण मिळवत. आणि आयुष्यात पुढे जात राहतं ते आपल्या पालकांचा अर्थविषयक दृष्टिकोन आणि मनोभूमिका घेऊनच ! ती काही बदलत नाही.
           जर मुलांना भविष्यात आर्थिक सुरक्षितता हवी असेल तर त्यांना जुन्या नियमांप्रमाणे न खेळता म्हणजेच सुरक्षित न खेळता, चलाखीने खेळायला शिकवलं पाहिजे. पैसा हे शक्तीचं रूप आहे. पण त्याहीपेक्षा प्रबळ आहे ते अर्थविषयक शिक्षण. पैसा येतो आणि जातो. तो पैसा कसं काम करतो किंवा त्याच्या कडून काम कसं करून घ्यायचं, यांचं शिक्षण घेणं हीच काळाची खरी गरज आहे.
          

Comments

Popular posts from this blog

बस तुम हो

ताई : चंद शब्द मेरी बहन के लिए।